यासंदर्भातील वृत्त असे की, नंदुरबार शहरातून एक मिनीट्रक कडबा भरून जात होती. पोलिसांना या वाहनात दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीजवळ ही मिनीट्रक अडविली. यासंदर्भात चालकाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी झडती घेतली असता त्यात एक लाख ७७ हजार २१६ रुपये किमतीचा १८० मिलीच्या तीन हजार ४०८ टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या तसेच ७२ हजार ३८४ रुपये किमतीचे एक हजार ३९२ सकू संत्रा देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी दारू जप्त केली आहे. चालक उल्हास गोसावी (रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी राकेश मोरे, सुनील पाडवी, बापू बागूल, दादाभाई मासूळ, विशाल नागरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.
नंदुरबारात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST