ब्राह्मणपुरी परिसरात बहुसंख्य ग्रामपंचायती ‘पेसा’ कायदाअंतर्गत येत असल्याने ग्रामसभांना त्या गावातील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभतो. परंतु गेल्या १० महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामसभा झाल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे . जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोनाचे नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यास परवानगी आदेश द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामीण भागात गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायती असून गावाचा विकास ग्रामस्थांच्या हाती यानुसार ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील सोय, गैरसोयी, अडचणी, रस्ते, पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, घरकूल लाभार्थी, रेशन धान्य लाभार्थी, इतर समस्या यांच्या कामाविषयी तक्रार होऊन त्याप्रमाणे त्याचे नियोजन करून उपाययोजना केल्या जात होत्या. परंतु कोरोना संसर्ग महामारीमुळे कोणत्याही गावात ग्रामसभा झालेली नाही. याबाबत शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसभा घेण्याबाबत शासनाकडून आदेश मिळाले नसले तरी हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊन ग्रामसभा घेण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन आल्यावर संबंधित ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.
ग्रामसभांअभावी ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST