कोरोना संपूर्णपणे संपला नसला तरी नागरिकांमधील बेफिकीरपणा कायम आहे. याच बेफिकिरीमुळे एस. टी.मधील एका प्रवाशाला एक नव्हे, तर पाच वेळा आपली जागा बदलावी लागल्याचा प्रकार नंदुरबार - धुळे बसमध्ये अनुभवयास मिळाला. प्रवास करताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याचे नियम आहेत. बसदेखील वेळेवर सॅनिटाईझ करण्याच्या सूचना आहेत. परंतु दैनंदिन व्यापात या सर्व सूचना व नियमांना फाटा दिला जात असल्याचे दिसून येत आहे. असाच मनस्ताप एका प्रवाशाला सहन करावा लागला. स्वत:बाबत अतिशय दक्ष असलेल्या या प्रवाशाने नंदुरबार स्थानकात धुळ्यासाठी बस लागल्यावर वाहकाच्या सीटमागील जागा सांभाळली. काही वेळाने त्याच्याजवळ एक तरुण येऊन बसला. त्याने मास्क लावलेला नव्हता. प्रवाशाने त्यास मास्क लावण्याची विनंती केली, परंतु त्याने मास्क नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबधित प्रवासी उठून दुसऱ्या सीटवर जाऊन बसला. तेथेही त्याच्याजवळ विना मास्क असलेला वृद्ध येऊन बसला. त्यालाही मास्क लावण्याची विनंती प्रवाशाने केली. परंतु त्यांच्याकडेही मास्क नव्हता. त्यामुळे ती जागाही त्याने सोडली. असे एक एक करीत पाच ठिकाणी फिरला आणि अखेर शेवटच्या सीटवर जाऊन बसला. वाहक जागेवर तिकीट काढण्यासाठी आल्यावर प्रवाशाने याबाबत तक्रार केली. परंतु वाहकाच्याही तोंडाला मास्क नव्हता. घाईघाईने वाहकाने खिशातून मास्क काढत लावला आणि आपण प्रवाशांना सांगण्यास हतबल असल्याचे सांगितले. स्वत:ला दोष देत आणि नियम न पाळणाऱ्यांविषयी चीडचीड व्यक्त करीतच संबंधित प्रवाशाने आपला प्रवास पूर्ण केला.
- मनोज शेलार, नंदुरबार.