लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाळचा केलीपाडा येथे वर्षभरापूर्वी केस कापले नाहीत, याचा राग धरुन एकाने पती पत्नीवर हल्ला करत दोघांना जखमी केल्याची घटना ११ जानेवारी रोजी घडली होती. पती-पत्नीने उपचार पूर्ण केल्यानंतर पोलीसात जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर खोजल्या वसावे याने एक वर्षापूर्वी जोला पारशी वसावे याची कटींग करण्यास नकार दिला होता. या गोष्टीचा राग मनात ठेवत जोला वसावे याने ११ जानेवारी रोजी कोलवीमाळ शिवारात शंकर वसावे याच्यासोबत वाद घातला होता. यातून जोला वसावे याने मोठा दगड शंकर वसावे याच्या पायावर मारुन फ्रॅक्चर केला. यावेळी सोबत असलेल्या शंकर वसावे याच्या पत्नीच्याही पाठीत दगड टाकून तिलाही गंभीर जखमी केले. दोघांवर ११ जानेवारीपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर शंकर खोजल्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन जोला वसावे याच्याविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस काॅन्स्टेबल मेढे करत आहेत.
कटींग न केल्याने पती-पत्नीस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:58 IST