तळोदा तालुक्यात बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. १५ ते २० मिनिटांपर्यंत पाऊस चालला. पाऊस कमी परंतु वादळ व विजांचा जोर अधिक होता. या वादळामुळे तालुक्यातील नर्मदानगर या सरदार सरोवर प्रकल्प विस्थापितांच्या वसाहतीतील राजा पाडवी, खेत्या वळवी व सिंगा पाडवी या तिघा बाधितांच्या घरांचे सिमेंट व कौलारू छप्पर उडून नुकसान झाले आहे. एका घराच्या सिमेंटच्या पत्र्यांचा तर अक्षरशः भुगा झाला आहे एवढा वादळाचा वेग होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. याबाबत महसूल प्रशासनास नुकसानग्रस्तांनी माहिती दिल्यानंतर तहसीलदार गिरीष वाखारे यांनी तातडीने संबंधित गावाच्या तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लगेच नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान, या वादळात नळगव्हाण येथे गायीवर वीज पडून तिचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे महसूल सूत्रांनी सांगितले.
नर्मदानगर येथे वादळामुळे घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST