नंदुरबार : पश्चिम राजस्थान तसेच कच्छ व सौराष्ट्राकडून उष्ण लहरी मोठ्या प्रमाणात लगतच्या परिसरात भेदत असल्याने नंदुरबारात सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ वाढते तापमान व उकाड्याने नागरिक बेजार झाले आहेत़नंदुरबारात तापमान वाढीचे रोजच नवनवे रेकॉर्ड होत आहेत़ मंगळवारी ४३ अंशावर असलेले कमाल तापमान बुधवारी ४३.३ अंशावर केले़ हवेत आद्रतेचे प्रमाणात तब्बल ४३ टक्के राहिल्याने नागरिक पूर्णपणे घामोघाम होत आहेत़ तापमान वाढ व असह्य उकाड्यामुळे नागरिक बेजार झाले असल्याचे दिसून येत आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानाचा सामना करावा तरी कसा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे़ तापमानाची तीव्रता इतकी आहे की, पंखे, कुलरदेखील निरुपयोगी ठरत असल्याची स्थिती आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातही तापमान वाढीची समस्या जाणवत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिवनावरही याचा परिणाम पडलेला दिसून येत आहे़नंदुरबारसह खान्देशात २६ ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा आयएमडीतर्फे देण्यात आलेला आहे़ यात, नंदुरबाराचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दुपारी नंदुरबारातील वर्दळीचे रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत़ रात्रीदेखील उष्णतेच्या झळा बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे़
उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्य झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:34 IST