ब्राह्मणपुरी : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे मधमाशी पालनावर वेबिनार घेण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.आर.एस. पाटील होते.
यासाठी विज्ञान भाग एक, दाेन, तीन व पदव्युत्तर भाग एक व दोनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चाळीसगाव येथील विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्रा.डाॅ.अरुण बी. सावरकर होते. वक्त्यांनी मधमाशी पालन, त्याचे फायदे व शेतीला पूरक म्हणून मधमाशी पालन कसे आवश्यक आहे या बद्दल मार्गदर्शन केले. मधमाशी ही पिकाच्या पराग सिंचनासाठी काय योगदान देते याबद्दल चर्चा केली.
आपल्या शेतात किंवा बागेल मधमाशी पालन कसे करता येते व त्यासाठी कुठून मार्गदर्शन मिळते याबद्दलही माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
प्रास्ताविक विभागप्रमुख डाॅ.आर.एम. चौधरी यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डाॅ.एम.के. पटले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.सारिका फुलपगारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राणीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.