यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी प्रदीप लाटे उपस्थित होते.
ॲड. पाडवी यांनी जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक पेरणीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री पाडवी यांनी, जिल्ह्यात झालेला कमी पाऊस लक्षात घेऊन पेरणी न झालेल्या क्षेत्रात कोणत्या पिकाची पेरणी करावी याविषयी शेतकऱ्यांना तालुकानिहाय माहिती देण्यात यावी. त्यानुसार आवश्यक असलेल्या बियाणांची मागणी त्वरित नोंदवावी. कमी पाणी उपलब्ध असताना पिकाबाबत घ्यावयाच्या खबरदारीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. अशा परिस्थितीत येणाऱ्या तूर, ज्वारी, बाजरी, मका, भगर आदी पिकांची पेरणी करण्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.डी. भागेश्वर यांनी आतापर्यंत झालेल्या पावसाची व पिकांच्या सद्य:स्थितीविषयी माहिती दिली. जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाला असून ३६ महसूल मंडळांपैकी सहामध्ये पावसाची टक्केवारी २५ टक्क्यांपेक्षा कमी असून परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांबाबत घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.