लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गोपाळनगर पुनर्वसन, ता.तळोदा येथे घरफोडी तर पळाशी, ता.शहादा येथे शाळेत चोरी करून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तळोदा व उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, गोपाळनगर पुनर्वसन येथे राहणारे बाज्या सिंगला वसावे यांच्या नवीन बांधकाम झालेल्या व दरवाजा नसलेल्या घरात घुसून चोरट्यांनी चोरी केली. घरातील ४४ हजार रुपये रोख व १० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागीने असा एकुण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बाज्या वसावे यांनी शोध घेतला असता ऐवज मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जगदाळे करीत आहे.दुसरी घटना पळाशी, ता.नंदुरबार येथे घडली. येथील संत दगाजी महाराज माध्यमिक विद्यालयात चोरट्यांनी संगणक लांबविले. विद्यालयाच्या संगणक कक्षाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील सहा हजार रुपये किंमतीचे संगणक, मॉनिटर व प्रिंटर चोरून नेले.३१ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान ही घटना घडल्याची शक्यता आहे. शाळेतर्फे परिसरात शोध घेण्यात आला, मात्र उपयोग झाला नाही.याबाबत शाळेचे कर्मचारी रवींद्र रमेश चौधरी यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नाईक करीत आहे.
गोपाळनगर पुनर्वसन व पळाशीला चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:40 IST