लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील बेबीबाई शंकर भिल यांनी घराच्या ओट्यावर बांधलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजता हल्ला चढवत एका शेळीला फस्त करीत दुसरीला जखमी केल्याची घटना घडली.याबाबत असे की, बेबीबाई शंकर भिल यांनी रात्री आपल्या सहा शेळ्यांना घराच्या ओट्यावर बांधल्या होत्या. रात्री ११ वाजता शेळ्या ओरडत असल्याने त्यांना जाग आली व त्यांनी पाहिले असता बिबट्याने एका शेळीला जखमी केले तर एक फस्त करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड करीत नागरिकांना जागे केले. या वेळी ग्रामस्थ जमा होताच बिबट्याने तेथून पळ काढला.या घटनेचे वृत्त सरपंच जयसिंग माळी यांनी वनखात्याचे अधिकारी व वनपाल आनंद पाटील यांना दिल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून ठसे घेतले असता बिबट्यानेच शेळीला फस्त केल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपूर्वीही विजय ठाकरे यांच्या गाईच्या बछड्याला नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला चढविल्याने या बिबट्याचा मानवी वसहातीत वाढलेला वावर पाहता त्याचा त्वरित जेरबंद करून नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई देवून बिबट्याला जंगलात सोडण्याची मागणी पशुपालक व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र जमदाळे यांनी शेळीवर पोस्टमार्टम केले.आदिवासी कुटुंब शेत मजुरीसह दुय्यम व्यवसाय म्हणून गायी व शेळ्या पाळत असतात. या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असतात. परंतु जंगलातील हिंस्त्र प्राणी आता मानवी वसाहतींकडे वळू लागल्याने या कुटुंबावर उपासमारीचे वेळ येऊ शकते. त्यामुळे संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे. सरपंच जयसिंग माळी यांनी गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे या हिंस्त्रप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरे व कॅमेरे लावले होते. परंतु त्यात बिबट्या जेरबंद होत नसल्याने बोरद व मोड परिसरात या हिंस्त्र प्राण्यांची परिसरात दहशत वाढत असल्याने वनविभागाने रात्रीच्या वेळेस गस्त घालून त्यांना त्वरित जेरबंद करावे अपेक्षा शेतकरी व पशुपालकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
बिबट्याकडून शेळी फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:25 IST