वाण्याविहीर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आता घराबाहेर निघताना हातात काठी घेऊनच निघत असून हा पिसाळलेला कुत्रा केव्हा समोर येईल व हल्ला करेल म्हणून सावधगिरी बाळगत आहे. बुधवारी सकाळी सेंट्रल बॅकेच्या ओट्यावर खेळणाऱ्या एका लहान मुलावर पिसाळलेला कुत्रा हल्ला करेल तोच जवळच असलेल्या त्याच्या मामाने आरडाओरडा करीत त्यास तेथून पळवून लावले. मात्र गल्लोगल्ली भटकत एका लहान मुलीच्या डोक्यावर चावा घेत डोक्याला दुखापत केली. त्यानंतर गल्लीत घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांना चावा घेत पळत सुटणाऱ्या या पिसाळलेल्या कुत्र्याने बाहेरगावाहून घरी परतणाऱ्या महिलेच्या पायावर चावा घेत दुखापत केली. आतापर्यंत या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान-मोठे अशा १५ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. त्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी व महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST