लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणपती मूर्ती विक्री स्टॉलला नियम व अटीच्या आधारे परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष नंदुरबार जिल्हा व गणपती मूर्ती विक्रीधारकांकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जगात कोरोनाची महामारी सुरु आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधासाठी उपाययोजना करुन जीवन, व्यवसाय (रोजीरोटी)साठीचे परवानगीसंदर्भात घालून दिलेल्या नियमानुसार आपण नंदुरबार शहरातील गणपती मूर्ती विक्री स्टॉल धारकांना परवानगी देण्यात यावी. गेल्या सहा महिन्यांपासून लोकांचे व्यवसाय थांबलेले आहे. रोजीरोटीचा विषय एैरणीवर आलेला आहे. त्यामध्ये गणपती मूर्तीकार वर्षभरापासून गणपती मूर्ती बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करीत असतात. अशा मूर्तीकार कारागिरांना त्यांनी आजपर्यंत गुंतविलेले पैसे (भांडवल) खुले होण्याची अपेक्षा आहे. मूर्तीकारांना गणपती मूर्ती विक्रीतून काही प्रमाणात संसाराच्या रहाटगाड्याला हातभार लागणार आहे. नंदुरबार शहराच्या धुळे रोड व एकलव्य विद्यालयाच्या चढतीच्या रस्त्यावर गणपती मूर्ती विक्रीचे स्टॉल लावले जातात. त्याच ठिकाणी गणपती मूर्ती विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. स्टॉलधारकांना स्टॉल बांधणे व गणपती मूर्ती आणणे यासाठी साधारणत: दोन दिवसाचा कालावधी आणि मूर्ती विक्रीसाठी पाच दिवसाचा कालावधी अशी सात दिवसाची परवानगी मिळावी. त्यामुळे शहरामध्ये गर्दी होणार नाही, हा विचारही महत्त्वाचा आहे. सर्व स्टॉलधारक येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर करुन सुरक्षिततेचे सर्व उपाय अवलंबून मूर्तीला हात न लावता मूर्ती विक्री करु आणि शासनाचे नियम काटेकोरपणे पाळू. त्याचबरोबर सर्व स्टॉलधारकांना नियम पाळण्यासाठी जागरुक करु. गणपती मूर्ती स्टॉलधारकांना मूर्ती विकण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सदस्य दिलीपकुमार ढाकणेपाटील, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुरेखा वाघ, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाबाई थोरात तसेच गणपती मूर्ती विक्री स्टॉलधारक प्रवीण थोरात, प्रल्हाद माळी, दिलीप कुंभार, सतीश कासार, मुन्ना वाणी, अजय पाटील, गणेश गुरव, चेतन चौधरी, भटू महाले, हेमंत पाटील, सुनील चौधरी, मोहन गुरव, दीपक गुरव, मोहित नेतलेकर, कैलास महाले, चेतन राजपूत, मधुकर चौधरी, जगदीश पवार, प्रमोद अभंगे, चैतन्य ढाकणेपाटील, नरेंद्र गुमाने, जितू कुलकर्णी, राकेश जमदाळे, रवी बजरंगे, विशाल इंदेकर, रवींद्र जगताप, योगेश सोनार, प्रमोद चौधरी आदींच्या सह्या आहेत.
गणपती मूर्ती विक्रीधारकांना परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:19 IST