लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत गतवर्षीची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करून त्याबाबत अहवाल त्वरीत सादर करावा, आरोग्य व प्रलंबीत कामांवरच निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.जिल्हा वार्षिंक योजना सर्वसाधारण,आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना सन २०१९-२० मध्ये वितरीत केलेल्या निधीचा खर्च व कामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, उपवनसंरक्षक सुरेश केवटे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य, रस्ते, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषद आदी विविध यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामावरील खर्च व उपयोगिता प्रमाणपत्र तसेच खर्च ताळमेळ अहवाल, कामाचा तपशिल त्वरीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.राज्यात कोरोना विषाणूमुळे साथीच्या परिस्थितीमुळे शासनाने जिल्हा वार्षिक योजनातंर्गत सन २०-२१ या आर्थिक वर्षांत मुळ अर्थसंकल्पित तरतुदीच्या ३३ टक्के निधी वितरीत करण्यात येणार असून या निधीतुन २५ टक्के निधी कोविड-१९ व आरोग्य विषयक कामावर खर्च करण्याचे निर्देश आहेत.प्राप्त निधीच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम पाहून इतर विभागांना त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार निधीची मागणी विभाग प्रमुखांनी करावी. कोविड-१९ परिस्थितीत आरोग्य विभाग तसेच अत्यावश्यक बाबी वगळता नवीन कामे प्रस्तावीत करु नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण योजना ) अंतर्गत ११२ कोटी निधी मंजूर झाला होता.त्यापैकी ११० कोटी नऊ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. तर आदिवासी उपयोजना (टी.एस.पी) अंतर्गत ३२९ कोटी ५७ लाख १८ हजार इतका निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ३२८ कोटी ४३ लाख ३८ हजार इतका निधी खर्च झाला आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (वि.घ.यो ) अंतर्गत ११ कोटी ४० लाख इतका नियतव्यय मंजूर झाला होता. त्यापैकी ११ कोटी पाच लाख ८० हजार इतका निधी खर्च करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आरोग्यासह व इतर अपुर्ण कामांवरच निधी खर्च होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:53 IST