नंदुरबार : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सुरु असलेला प्रचार शनिवारी थंडावणार आहे़ रिंगणातील उमेदवारांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून येथे प्रचार सुरु केला होता़ प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केवळ चार नेत्यांच्या पाच प्रचारसभा जिल्ह्यात झाल्या आहेत़अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी २ एप्रिलपासून निवडणूक अधिसूचना जारी झाली होती़ तत्पूर्वी विविध पक्षांनी उमेदवार निश्चित केल्याने गावोगावी नागरिकांच्या भेटीगाठी आणि कोपरा सभांच्या माध्यमाने कार्यकर्ते व पदाधिकारी उमेदवारांचा प्रचार करत होते़ १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर ११ उमेदवार रिंगणात होते़ यात भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत, काँग्रेसचे अॅड़ के़सी़पाडवी, बहुजन समाजपार्टी व समाजवादी पक्ष आघाडीच्या रेखा सुरेश देसाई, बहुजन वंचित आघाडीतर्फे डॉ़ सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदीप अभिमन्यू वळवी तर भाजप बंडखोर अपक्ष अजय करमसिंग गावीत, अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंह पाडवी, आनंंदा सुकलाल कोळी यांचा समावेश आहे़ १२ एप्रिल रोजी माघारीच्या अंतिम मुदतीत दोघांच्या माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली होती़ धडगाव, अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागासह नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर हे सपाटीचे तालुके तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री या दोन विधानसभा मतदारसंघापर्यंत विस्तारलेल्या लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु होता़ यात प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यांसह स्थानिक विषयांवर चर्चा घडवून आणली जात होती़ शहरी आणि ग्रामीण भागात प्रचारासाठी पारंपरिक भोंग्यांचा यंदाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे़ पक्षांच्या कामगिरीची तसेच प्रचार करणाऱ्या आॅडिओ क्लिप लावून सायंकाळी पाचपर्यंत ही वाहने गावोगावी फिरत असल्याने प्रचारात रंगत आली होती़ शहरी भागात डिजीटल स्क्रीनच्या माध्यमांचाही वापर करण्यात आला़गावोगावी भाजप, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, बसपा-समाजवादी पार्टी, बीटीपी यासह अपक्ष उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सायंकाळी पाच वाजेनंतर प्रचार करण्यास बंदी येणार असल्याने गेल्या दोन दिवसांपासून जास्तीतजास्त गावे ‘कव्हर’ करण्यासाठी प्रचंड धावपळ सुरु होती़ १२ एप्रिलपासून सुरु असलेल्या निवडणूक प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार शहरालगतच्या मैदानावर प्रचारसभा घेतली होती़ वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार शहरातील दीनदयाल चौकात सभा झाली़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिरपूर आणि पानीबारा ता़ धडगाव येथे सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते़ पिंपळनेर ता़ साक्री येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली़ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारातील इलाही चौक आणि सुभाष चौकात सभा घेतली़ निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सर्व सभांना त्या-त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जिल्ह्याच्या विविध भागातील मतदारांनींही हजेरी लावत निवडणूक प्रचारातील उत्साह दाखवून दिला होता़
लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:49 IST