लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील एकाचा अहवाल सुरत येथे पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ दरम्यान प्रशासनाने चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी दिली आहे़अक्कलकुवा शहरात गेल्या आठवड्यात एका राष्ट्रीयकृत बँकेतील दोन अधिकारी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता़ त्यांच्यावर उपचार पूर्ण होवून ते बरे झाले आहेत़ दरम्यान शहरातील हवालदार फळी येथील एक रुग्ण सुरत येथे १२ जुलै कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे़ प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णाची चौकशी करुन संपर्कात आलेल्या चौघांना खापर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे़ कोरोनाबाधित रुग्णाचे घरही सील करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़ कोरोनाचे निदान होण्यापूर्वी बाधित रुग्णाने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता़ हे रुग्णालयही आरोग्य विभागाने सील केले आहे़ नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत़ अक्कलकुवा शहरात अनेक जण बेजबाबदारपणे वागत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे़ सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत आहे़शहर व तालुक्यात बाधित रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे़ घराबाहेर पडताना मास्क लावावे व सोशल डिस्टन्सिंग करावे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांनी कळवले आहे़
अक्कलकुव्यातील चौघे क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:45 IST