लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या नर्मदा काठावरील गावातील लोकांना आरोग्यसेवेसाठी सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातील धडगाव कॅम्पसाठी तरंगता दवाखान्यासाठी दिलेली बोट आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मणिबेली गावाजवळ अडगळीत पडली असून कोट्यवधी रुपयांच्या या बोटला जलसमाधी मिळण्याच्या मार्गावर आहे.अक्कलकुवा व धडगाव या दोन्ही तालुक्यातील नर्मदा काठावरील ३३ गावातील लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात पाच तरंगते दवाखाने म्हणजेच बोटी देण्यात आलेल्या होत्या. यापैकी दोन अक्कलकुवा तालुक्यासाठी व दोन धडगाव तालुक्यासाठी सध्या कार्यरत आहेत व एक तरंगत्या दवाखान्याची बोट अनेक वर्षापासून अप्रशिक्षित चालकाच्या हलगर्जीपणामुळे नादुरुस्त झाल्याने पडून आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरोग्यसेवेच्या बोटीला आरोग्य विभाग उघड्या डोळ्यांनी जलसमाधी देण्याची वाट पाहत आहेत. याबाबत जिल्हा परिषद सदस्या बाजूबाई किरसिंग वसावे यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या बोटीच्या दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.आरोग्य विभागाला जलसमाधीची प्रतीक्षा?अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील गावांच्या नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांना दोन इंजिन बोटी देऊन तरंगता दवाखाना सुरू करण्यात आला. त्यापैकी धडगाव कॅम्पची एक बोट चार वर्षापासून बंद अवस्थेत मणिबेली गावाजवळ जलाशयात पडून असून तिच्यात पाणी भरले जात आहे. केवळ जि.प. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे बोटीची किरकोळ दुरुस्ती न झाल्याने काही दिवसात बोटीला जलसमाधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
नर्मदेतील तरंगता दवाखाना थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:31 IST