नंदुरबार : जिल्ह्यात कोवॅक्सीनचा ठणठणाट असून त्याअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले आहे. ज्या ठिकाणी आहेत तेथे केवळ पहिला डोस घेणाऱ्यांनाच त्याची लस दिली जात आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस लवकरच प्राप्त होतील असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविशिल्डचे पुरेसे डोस उपलब्ध असून त्याचे लसीकरण नियमित सुरू आहे.
जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असतांना कोव्हॅक्सिनचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना तो दिला जात नाही. जिल्हा रुग्णालयातील प्रमुख लसीकरण केंद्रावर तर कोव्हॅक्सिनची लस लपलब्ध नसल्याने दुसरा डोस मिळणार नसल्याचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना फिरफिर करावी लागत आहे. २८ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असले तरी दुसरा डोस घेण्यास काहीही अडचणी नाहीत. त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी घाई करू नये असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोवॅक्सीन लसीचे साधारण १२ हजार डोस जिल्ह्याला लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात कोविशिल्ड लसींचा पुरेसा साठा असून त्याचे लसीकरण सर्वच लसीकरण केंद्रांवर नियमितपणे सुरू आहे.