लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 17 वर्षापूर्वी नंदुरबार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीतास राजस्थानमधून ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत (36) रा.अजित, ता.शिवना, जि.बाडमेर असे संशयीताचे नाव आहे. नंदुरबारातील वेडू गोविंदनगरमध्ये 1 जून 2003 रोजी ही घटना घडली होती. अॅड.अनिल लोढा यांचे बंधू व व्यापारी पारस लोढा यांच्याकडे पुष्पेंद्रसिंह उर्फ पेप्सी भवरसिंह उर्फ किशोरसिंह बालावत याच्यासह इतर दोघांनी किराणा दुकानातील मजुरीच्या पैशांतून वाद घालून मारहाण करीत ठार केले होते. याबाबत नंदुरबार शहर पोलिसात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून तिन्ही संशयीत आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फरार गुन्हेगारांची शोध मोहिम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किशोर नवले यांनी 15 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार लोढा यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीतांविषयी त्यांना गुप्त माहिती मिळाली. संशयीतापैकी पेप्सी हा बाडमेर जिल्ह्यात त्याच्या राहत्या गावी आला असल्याची माहिती नवले यांना मिळाल्यावर त्यांनी लागलीच पथक तयार करून रवाना केले. परंतु 1100 किलोमिटर लांब, राजस्थानमधील विरळ वस्तींचे गावे आणि भाषा व वेश याची अडचण यामुळे मोहिम फत्ते होईल किंवा कसे याची शंका मनात असतांना त्यांनी पथकाचे मनोधैर्य वाढवून रवाना केले. पथक बाडमेर जिल्ह्यातील समदडी येथे पोहचल्यावर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. राजस्थानी पेहराव करून संशयीत राहत असलेल्या अजित या गावाची आणि परिसराची बारकाईने माहिती घेत निरिक्षण केले. गावात जाण्याचा आणि गावातून बाहेर येण्याचा मार्ग समजून घेतला. त्यानुसार 6 नोव्हेंबरची रात्र आणि 7 नोव्हेंबरची उत्तर रात्र या दरम्यान अचानक धाड टाकण्याचे ठरविण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथक गावात पोहचल्यावर अचानक वादळ सुरू झाले. परिणामी काही काळ मोहिम थांबवावी लागली. या दरम्यान पथक निरिक्षिक किशोर नवले यांच्या संपर्कात होते. ते वेळोवेळी पथकाचे मनोधैर्य वाढवीत होते. वादळ शांत झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पथकाने पेप्सीच्या घरावर धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. 17 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील संशयीताचे कुठलेही छायाचित्र किंवा स्केच पोलिसांकडे नव्हते. संशयीतांची काहीही माहिती नव्हती. शिवाय एवढय़ा दूर असलेल्या गावात जावून संशयीताचा ताब्यात घेण्याचे दिव्य देखील होतेच. परंतु या सर्वावर मात करून एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी पथकाला तयार केले. त्यांना बारीकसारीक बाबी समजून सांगितल्या. येणारी संकटे आणि अडचणी यांची जाणीव करून देत मनोधैर्य वाढविल्याने ही मोहिम फत्ते झाल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. 7 रोजी सकाळी पथक संशयीत पेप्सी उर्फ किशोरसिंह बालावत याला घेवून नंदुरबारकडे निघाले. या सर्व मोहिमेत पथकाला समदडी पोलीस ठाण्याचे निरिक्षक मिळुराम मिना व त्यांच्या पथकाचे मोठे सहकार्य मिळाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, फौजदार भगवान कोळी, हवालदार प्रदीप राजपूत, किरण पवार, मोहन ढमढेरे, जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.
अखेर 17 वर्षानंतर ‘पेप्सी’ पोलिसांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:01 IST