लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीवर चरित्राच्या संशय घेऊन मारहाण करून शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात शहादा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळील माहेर असलेल्या योगिता प्रशांत चौधरी यांचा विवाह एप्रिल २००८ मध्ये नांद्रा जि. जळगाव येथील प्रशांत सुरेश चौधरी यांच्यासोबत झाला होता. या दोघांना एप्रिल २००९ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले होते. दरम्यान वेळोवेळी योगिता यांचा पती व सासरची मंडळी किरकोळ कारणातून छळ करत होते. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करत होते. दरम्यान २०१५ मध्ये मारहाण अधिक झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर योगिता यांना घराबाहेर काढून देण्यात आले होते. या प्रकारानंतर विवाहिता ही माहेरी आली होती. याचा फायदा घेत प्रशांत चाैधरी याने गेल्या सात जानेवारी रोजी सात बिजासनी माता मंदिर येथे बहादरपूर येथील युवतीशी विवाह केला होता. विवाहानंतर शहादा येथे येवून योगिता चाैधरी यांना मारहाण करत घटस्फोट देण्याचा दबाव टाकून मारहाण करण्यात आली होती. घटनेनंतर विवाहिता योगिता यांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरुन पती प्रशांत, सासरे सुरेश दामोदर चौधरी , सासू अलका तिघे रा. नांद्रा. जि.जळगाव, नणंद वैशाली विजय चौधरी, नंदोई विजय पितांबर चौधरी, भाचा प्रतीक चौधरी, तेजस चौधरी, सर्व रा. खेतिया (मध्यप्रदेश) व पती प्रशांत याची दुसरी पत्नी संगीता चौधरी रा. बहादरपूर ता. पारोळा अशा आठ जणांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.नंदुरबारातील विवाहितेचाही छळ नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील माहेर असलेल्या दिपांजली कमलेश माेहिते यांचा धुळे येथे शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला. मे २०१५ पासून त्यांचा छळ सुरु होता. घरगुती कामांवरुन दिपांजली यांचा सासरचे छळ करत होते. त्यांनी माहेरी आल्यावर हा प्रकार कथन केला होता. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती कमलेश रमेश मोहिते, सासू सुमनबाई रमेश मोहिते व सासरे रमेश बारकू मोहिते सर्व रा. आदर्श नगर धुळे यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.
दुसरा विवाह करणा-या पतीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:53 IST