यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. गैरप्रकार तत्काळ थांबवावे, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, परिवहनमंत्री यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. परंतु ठोस उपाययोजना न झाल्याने नाईकांनी पुन्हा निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावर आलेल्या वाहनचालकांकडे कागदपत्र असल्यावरही पैशांची मागणी केली जाते.
बेडकीपाडा तपासणी नाक्यावर गैरप्रकार करण्याचे काम या ठिकाणी कार्यरत असलेले परिवहन विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी करत असल्याचा आरोप होत आहे. या नाक्यावरून चोवीस तासात अडीच हजारांवर ट्रक मार्गस्थ होतात. ट्रकचालकांकडून अवैध मार्गाने लाखो रुपये वसूल केले जातात, असा आरोप केला जात आहे. नाक्यावर काही मोटर वाहन निरीक्षकांनी खासगी पंटर नेमले आहे. हे पंटर (एडीसी) शासन नियुक्त नसून, आरटीओ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहनचालकांकडून कागदपत्र मागतात. त्याचबरोबर परवाने तपासण्याचे काम करतात. कागदपत्रांची योग्य तपासणी न करता मनमानी पद्धतीने नियमापेक्षा अधिक रक्कम वसूल करतात, असा आरोप वाहनचालकांनी केला आहे. त्याचबरोबर पैसे न देणाऱ्या वाहनचालकांना शिवीगाळ करून दर्जाहीन वागणूक दिली जाते. त्यामुळे तपासणी नाक्यावर सुरू असलेले गैरप्रकार तत्काळ थांबवून शासनाची दिवसाढवळ्या लूट करणारे एडीसी व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. सीमा तपासणी नाक्यांवर पूर्वी एडीसी (खासगी पंटर) म्हणून स्थानिक काही जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाक्यावर अनेक वाद निर्माण होत असल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्थानिक खासगी पंटर काढून बाहेरील पंटरमार्फत अवैध वसुली केली जात आहे.
गावगुडांना चेक पोस्टचा ठेका ?
सीमा तपासणी नाक्यावर गावगुडांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध वसुलीविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा गावगुंडाकडून बंदोबस्त केला जातो. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात. ट्रकचालक-मालक खासगी पंटर व आरटीओ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर शहरातील काही पुढारी पोलीस ठाण्यात धाव घेतात. काही राजकीय मंडळींच्या अवैध वसुलीला विरोध असून, काहींचे पाठबळ आहे.
चेक पोस्ट नाक्यावरील असुविधा
आरटीओ अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर न बसता अन्य ठिकाणी बसून करतात टॅक्स वसूल.
मोटर वाहन निरीक्षकांचा शासकीय निवासस्थानाऐवजी अन्य ठिकाणी मुक्काम. वजनकाट्यात घोळ असल्याने येथील कंपनीला अनेकवेळा नोटीस, गुन्हेही दाखल.
अनेक वाहनचालक टॅक्स चुकविण्यासाठी उच्छलमार्गे गांधीनगर गावातून होतात मार्गस्थ.
शहरातील काही राजकीय मंडळींनीच घेतला ट्रक पास करण्याचा ठेका. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात तफावत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.