नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे बाजार समितीतील खरेदी व विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. यातून कांदा दरही घसरले असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरात कांदा आवक घसरली आहे. काही शेतकरी कांद्याचे कट्टे तयार करून त्याची वसाहतींमध्ये विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. यातूनही लाभ होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
धुळे चाैफुली परिसरात खड्डा ठरतोय जीवघेणा
नंदुरबार : शहरातील वळण रस्त्यावर जाणता राजा चाैक ते धुळे चाैफुलीदरम्यान दोन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यातून वाहनधारकांची भंबेरी उडत आहे. रात्रीच्या वेळी भरधाव वेगातील वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
बाहेरगावच्या रुग्णांची संख्या वाढली
नंदुरबार : शहरातील खासगी कोविड हाॅस्पिटल्समध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. लगतच्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर, साक्री तालुक्यातील रुग्ण प्रामुख्याने याठिकाणी येत आहेत. शहरातील खासगी दवाखान्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने येथे रुग्ण दाखल केले जात असल्याचा दावा रुग्णालयांच्या प्रशासनाकडून केला जात आहे.
शिबिरातून मार्गदर्शन
नंदुरबार : तालुक्यातील दुधाळे येथील मूकबधिर निवासी विद्यालयात आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र व दुधाळे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण पार पडले. यावेळी गटशिक्षण अधिकारी पी.एन. पाटील, राजेश चौधरी, सरपंच सत्यप्रकाश माळचे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
रस्ता काम सुरू
बोरद : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर ते बोरद या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येऊन काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यासाठी १७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या सूचनेनुसार हे काम पूर्ण करण्यात येत आहे.
बँकिंग सेवेवर ताण वाढला
नंदुरबार : जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे कोरोनामुळे रोटेशन पद्धतीने काम करत आहेत. यातून सेवेवर ताण पडत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान ग्रामीण भागात काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले होते. ते अद्यापही परत आलेले नसल्याने तेथील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत.
मोड येथे जनजागृती
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येेथे जनजागृती सुरू आहे. आरोग्यसेविका विमलबाई वळवी, शाळेचे मुख्याध्यापक कैलास लोहार, उपशिक्षक दौलत रामोळे, मधुकर कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, संगीताबाई चौधरी, सुदाम गोसावी, गुंता गावित, सीमा पाटील हे परिश्रम घेत आहेत.
मोकाट श्वानांमुळे त्रस्त
नंदुरबार : शहरातील वाघोदा, पातोंडा व होळतर्फे हवेली शिवारातील मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या श्वानांचा संबंधित विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी आहे. श्वानांच्या झुंडी रात्री-अपरात्री वसाहतींमध्ये धावत पळत सुटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
माळीवाड्यातील केंद्रात उभारला मंडप
नंदुरबार : माळीवाडा भागात फुले पुतळ्याजवळ आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्रावर गर्दी होते. याठिकाणी जागेअभावी कडक उन्हात नागरिक थांबून असल्याचे दिसून येत होते. नागरिकांची ही गैरसोय पाहून नगरसेविका सिंधूबाई माळी, नगरसेवक आनंद माळी व लक्ष्मण माळी यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत तिथे सावलीसाठी मंडप टाकून दिला. आरोग्य केंद्रातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सावली मिळाली आहे. तरी सर्वांचे लसीकरणासाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणी करण्याचे कळवण्यात आले आहे.
रस्ता काम पूर्ण
नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबारदरम्यान कोळदा गावापर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झाला होता. हा रस्ता बांधकाम विभागाने दुरुस्त करून दिला आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. नागरिकांनी या पाठपुराव्याचे काैतुक करून समाधान व्यक्त केले आहे. मार्गावर मोठे खड्डे होते.
इमारती वाऱ्यावर
नंदुरबार : कोराेनामुळे बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती सध्या वाऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी शिक्षक जात नसल्याने चोरीचे प्रकार घडून गेले आहेत. सर्वच शिक्षक सध्या कोरोनासाठी कर्तव्य बजावत असल्याने शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.