लोकमत न्यूज नेटवर्कआमलाड : तळोदा तालुक्यातील आमलाड येथील भरवस्तीत बिबट्याने हल्ला करून शेळी पळवल्याने ग्रामस्थांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.आमलाड गावातील कोळीवाडा मारुती मंदिराजवळ राहणारे राजधर भाईदास कोळी यांच्या राहत्या घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपातील शेळी शुक्रवारी रात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून पळवून नेल्याची घटना घडली. रात्री राजधर कोळी हे आवाज आल्याने घरातून बाहेर आल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली. बिबट्याने आधी शेळीवर हल्ला केला. त्या शेळीचा दोर सुटला नसल्याने ती मेल्यावर बिबट्याने आपला मोर्चा दुसऱ्या शेळीकडे वळवून तिला उचलून पसार झाला. वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आता बिबट्या भरवस्तीत घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागल्याने आणि भविष्यात मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने उपाय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात बिबट्याचे दर्शन अनेकवेळा ग्रामस्थांना दिसले असून त्याबाबत वेळोवेळी ही बाब वनविभागाच्या लक्षात आणून दिली आहे. याआधी याच परिसरातून वासरू पळवल्याची घटना घडली होती. याबाबत वनविभागाकडे वेळोवेळी तक्रार करूनही वनविभागाने कोणतीही पावले उचलली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गावात खाजगी मालकीच्या अनेक मोकळ्या जागा असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडेझुडपे उगवले असून ही ठिकाणे बिबट्यास लपून राहण्यासाठी सोयीची असल्याने ती झाडेझुडपे साफ करण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
भरवस्तीत बिबट्याचा शेळीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 13:02 IST