नंदुरबार तालुक्यात हरभरा कापणीला वेग
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध भागांत हरभरा कापणीला वेग आला आहे. ऊन वाढू लागल्याने शेतकरी कापणीला गती देत असून, कापलेला हरभरा खळवाडींमध्ये सुकवण्यासाठी टाकला जात आहे. यामुळे मजुरांनाही कामे मिळत आहेत.
दुर्गम भागातील पाणीटंचाईची दखल घ्यावी
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील पाड्यांवर सालाबादाप्रमाणे यंदाही पाणीटंचाईची झळ बसण्याची चिन्हे आहेत. टंचाईयुक्त गावांमध्ये उपाययोजना करण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गाव-पाड्यांवरून सुचविण्यात आलेल्या हातपंप व पाणी योजनांचे कामकाज पूर्ण करण्याची मागणी असून, प्रशासनाने याचा आढावा घ्यावा अशी अपेक्षा आहे.
बसस्थानकात गर्दी
नंदुरबार : रविवारी शहरात विवाह सोहळ्यांची रेलचेल असल्याने नंदुरबार बसस्थानकात गर्दी दिसून आली. ग्रामीण भागासह जिल्ह्यातील विविध भागांतून प्रवासी याठिकाणी आले होते. यातून बसेसलाही गर्दी होती. दरम्यान, यावेळी मास्क लावण्याच्या सूचना एसटी महामंडळाकडून केली जात होती.
रसवंती गृहे सुरू
नंदुरबार : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागांतील रसवंतीगृहे सुरू झाली आहेत. उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठी मागणी असल्याने जागोजागी रसवंतीगृहे सुरू होतात. जिल्ह्यातील विविध शहरांसह मुख्य मार्गांवर ही रसवंतीगृहे सुरू करण्यात आली आहेत.
कृषी विभागाच्या बंधाऱ्यांची दुर्दशा
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात २०१५ ते २०१९ या काळात बांधकाम करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत बंधाऱ्यांची दुर्दशा झाल्याचे त्या-त्या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काहीकाळ पाणीसाठा झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. बंधाऱ्यास भेगा पडून पाणी वाहून जात असल्याने हे बंधारे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी निरुपयोगी ठरत आहेत.
फळबाजारात कैरी वेधत आहे लक्ष
नंदुरबार : बाजारपेठेत कैरीचे आगमन सुरू झाले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील आंबा झाडांवर लगडलेल्या कैऱ्या तोडून त्या विक्रीसाठी आणल्या जातात आहेत. आवक कमी असल्याने कैरीचे दरही वाढीव असल्याचे सांगण्यात आले.
मास्क नसल्यास रिक्षातून प्रवासाला बंदी
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र चिंता आहे. सर्वत्र उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या या उपाययोजना एकीकडे सुरू असताना नंदुरबार शहर ते प्रकाशा यादरम्यान वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर मास्क नाही त्याला प्रवेश नाही असे लिहून घेत उपाययोजनांची सक्ती केली आहे. हा रिक्षाचालक सध्या काैतुकास पात्र ठरला असून, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येकाला मास्क गरजेचा का, आहे याची माहिती देत कोरोनाबद्दल माहितीही देत आहे.