तळोदा : येथील वनविभागाचा कार्यालयापासून नजीक असलेल्या बहुरूपा शिवारातील एका कपाशीच्या शेतात बिबट्याचा नर, मादी जोडी बरोबरच चक्क सिंह बांधावर बसल्याचे गुरूवारी सकाळी दिसून आल्याचे दोघा शेतकरी बंधू व रखवालदार यांनी सांगितले. त्यांनी पाच मिनिटे त्यांची गंमत ही पाहिली होती. शेवटी तेथून तो जवळच्या उसाच्या शेतात निघून गेला. दरम्यान ही घटना शेतकऱ्यांनी वनविभागास कळविल्यानंतर त्यांचे पथक तेथे दाखल होऊन या प्राण्यांचे पायाचे ठसे घेतले आहेत. गेल्या महिनाभरापासून शेत शिवारात वावरणाऱ्या बिबट्याने आता शहाराजवळच आपली स्वारी वळवली आहे. गेल्या आठवड्यात शहादा रस्त्यावरील एका सर्व्हिस सेंटर नजीक रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना दिसून आला होता. त्यावेळी या रस्त्यावरून फिरणाऱ्या पादचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली होती. तालुक्यातील शेत शिवारात आजपावेतो बिबट्या, त्याची मादी, पिलांचा वावर असल्याच वार्ता ऐकावयास मिळाल्या आहेत. मात्र, गुरुवारी सकाळी तर बिबट्याचा नर, मादीसह सिंहच दोघा शेतकरी बंधू, रखवालदारास वनविभागाचा परिसर नजीक असलेल्या बहुरूपी शिवारातील कपाशीच्या शेतात दिसला होता. तोही अगदी शंभर फुटावरील बांधावर बसल्याचे दिसला होता. तळोदा शहरातील खान्देशी गल्लीतील उमाकांत शेंडे व वसंत शेंडे हे दोघे शेतकरी बंधू नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी मळ्यात उभारण्यात आलेल्या गोठ्यातील म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले होते. बिबट्याचा वावर असल्यामुळे हातात डेंगरासोबत घेऊन जात असत. म्हशीचे दूध काढत असतानाच रखवालदाराची लहान मुलगी भेदरलेल्या अवस्थेत रडत झोपडीपाशी आली. तेव्हा तिला विचारले असता तिने त्या प्राण्याचा दिशेने बोट दाखविला त्यांनी पुढे येऊन पाहिले असता बांधावर सिंह बसल्याचे दिसले. त्यांनी सिंहच असल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्याची पाच ते सात मिनिटे गंमत पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर तो जवळच्या उसाच्या शेतात निघून गेला. जसे तसे म्हशीचे दूध काढून हे सर्व जण वाटेला लागले असतानाच लिंबाचा झाडाच्या फांदीवर बिबट्या व त्याच्या मादीने उडी मारल्याचे या तिघांनी पाहिले. परंतु हे नर, मादी आपल्या मस्तीत दिसून आले. त्यानंतर रस्ता बदलून घरी आले. मोटारसायकल तेथेच सोडून दिली होती. ही घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर वनक्षेत्रपाल निलेश रोहडे, वानपाल नंदू पाटील, वासुदेव माळी, विरसिंग पावरा, लक्ष्मी पावरा यांचा पथकाने घटना स्थळी भेट दिली. त्यांनी जागेची पाहणी केली. या प्राण्यांचा पायाचे ठसे देखील घेतले आहे.
वनविभाग लावणार ट्रॅप कॅमेरे
सदर शेतकऱ्यांनी सिंह असल्याचा दावा केला असला तरी वनविभागाचे अधिकारी दुजोरा देत नाही. त्यांनी पायाचे ठसे घेतले आहेत. त्यावरून ते सिंहाचे आहेत असेही निश्चित सांगता येत नाही. परंतु ठशाचे नमुने तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. तळोदाच काय संपूर्ण राज्यात सिंह नाही असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तरीही त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सायंकाळी बसविणार आहोत. त्यामुळे निश्चितच कोणता प्राणी आहे. याचा उलगडा होईल.
संबंधित शेतकऱ्याने मादीसह बिबट, सिंह शेतात दिसल्याची माहिती दिल्यानंतर पथकासह घटना स्थळी दाखल झालो. त्या प्राण्याचा पायाचे ठसे घेतले आहेत. ठशावरून निश्चित सांगता येणार नाही. त्यासाठी तेथे कॅमेरे बसविणार आहोत.
- निलेश रोहडे, वनक्षेत्रपाल, तळोदा.
शेतातच म्हशींची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे बंधूसह गुरूवारी सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेलो होतो. जवळच्या बांधावर सिंह बसलेला दिसून आल्याचे आम्ही तिघांनी पाहिले. तेथून जवळच लिंबाच्या झाडाजवळ बिबट्या मादीसह दिसून आला. शंभर टक्के सिंहच होता.
- उमाकांत शेंडे, शेतकरी, तळोदा