लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : वाळू वाहतुकीबाबत कोणताच ठेका नसताना शहादा परिसरातील वाळूची चोरी करणाऱ्या तस्करांनी आपला उद्योग कायम ठेवत दिवस-रात्र करीत ट्रॅक्टरने रोजच गोमाई व जवळपासच्या नद्यांमधून वाळू चोरून परिसरात विकत असल्याने त्यांनी लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांची एैशीतैशी करून टाकली आहे. काही दिवसांपूर्वी शहादा तहसीलदारांनी धडक कारवाई केल्यानंतरही या तस्करांची मुजोरी कायम दिसून येत आहे. महसूल विभाग कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने त्याचा फायदा वाळू तस्कर घेत आहेत.कोरोना वैश्विक महामारीने सर्व विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. प्रत्येक नागरिक आपला जीव कसा वाचवता येईल याकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि या विषाणूची साखळी तोडता यावी यासाठी देश, राज्य व जिल्ह्याच्या सीमींवर तपासणी करीत संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. एवढेच नव्हे तर या बाबींची कठोर अंमलबजावणी व्हावी म्हणून काही भागात संचारबंदीही लागू केली आहे. मात्र या लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम शहादा परिसरातील ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरी करणाºया तस्करांना लागू होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी स्वत: जाऊन गोमाई नदीत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई केली होती. मात्र त्या कारवाईनंतर आता पुन्हा राजरोसपणे वाळूची वाहतूक होत आहे.शहादा शहराला लागून वाहणारी गोमाई नदीपात्रातून राजरोसपणे कोणताही धाक न बाळगता दिवसाढवळ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू भरून परिसरात वाळू विकण्याचा सपाटा लावलेला आहे. याविरोधात कारवाई करणारा विभाग कोरोना या संसर्गजन्य आजारावर उपाययोजना आणि अंमलबजावणीसाठी जीवाचे रान करीत आहे आणि याच गोष्टीचा फायदा शहादा येथे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे वाळू माफियांची चांगलेच फावले आहे. शहराला लागून वाहणाºया गोमाई नदीतून चोरीछुपे नेहमीच वाळूची चोरी केली जाते. मात्र आता कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण महसूल विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी लागल्याने त्याचा फायदा घेत लोणखेडा, मलोणी, उंटावद, तिखोरा व शहरातील भावसार मढीसमोरच्या नदीपात्रामध्ये ट्रॅक्टर्सची गर्दी बघायला मिळत आहे. चढ्या दराने शहादा परिसरात चोरीची वाळू विकण्यात येत आहे. हा नित्याच्या प्रकार रोज नागरिकांना अनुभवास येत आहे. मात्र यावर कोणीही अंकुश लावताना दिसत नाही. राजकीय वरदहस्त आणि अर्थकारण याशिवाय हे शक्य नाही, असे सुजाण नागरिक आता बोलू लागले आहेत.सध्या कोरोना विषाणून प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आदी शासकीय कर्मचारी हे आपल्या नेमणुकीच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असताना दिवसाढवळ्या राजरोसपणे नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक होत असताना या शासकीय कर्मचाºयांना ती दिसत नसेल का? दिसत असेल तर कायद्याच्या कोणताही धाक न बाळगता बिनधास्तपणे वाळू वाहतूक करणाºयांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडत आहे.शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासन अतिशय परिश्रम घेत दिवस-रात्र शहरातील विविध भागांमध्ये जात आहे. तरी शासनाचा कोणताच धाक न बाळगता शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हातावर पोट भरणारे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे संचारबंदीची एैशीतैशी करीत नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरी करून माफिया मालामाल होताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम वाळूची चोरी करणाºया माफियांना नाही काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत वाळूची बेसुमार चोरटी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:23 IST