नंदुरबार : अनलाॅकनंतरही शहरात विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. शेतशिवारातून उत्पादन भरघोस येत असल्याने भाजीपाला दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
लाॅकडाऊन काळातही जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार कायम ठेवण्यात आले होते. त्यातून मुबलक प्रमाणात भाजीपाला शहरी भागात येत होता. ऐन उन्हाळ्यात भाजीपाला आवक समाधानकारक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. हा भाजीपाला साध्या दरांमध्ये उपलब्ध होत असल्याने नागरिक खरेदीसाठी दररोज गर्दी करत होते. अनलाॅकमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता होती; परंतु निवडक भाज्यावगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
कोरोनाकाळात काहीअंशी अडचणी आल्या परंतु वाहतूक सुरू असल्याने भाजीपाला नियमितपणे बाजारात जात होता. आताही भाजीपाला बाजारात नियमित जात आहे. त्यातून नियमित आवक सुरू आहे. शेतातील उत्पादनही समाधानकारक आहे. येत्या काळात ही आवक वाढणार आहे.
-संजय माळी,
शेतकरी
कोरोनाकाळातही नंदुरबार शहर व परिसरात भाजीपाला पुरवठा करत होतो. वांग्यांना मोठी मागणी असते. सध्या कोथिंबीर आणि पालक यांचे मुबलक उत्पादन आहे. येत्या काळात पाणकोबी व फ्लाॅवर यांचे उत्पादनही येणार आहे.
-योगेश माळी,
शेतकरी
लॉकडाऊनकाळात बाजार समिती सुरु होते. यातून बाजारात भाजीपाला येत होता. आताही सारखीच स्थिती आहे. येत्या काळातही आवक वाढली आहे. ग्रामीण भागातून चांगला भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. त्यातून आवक अधिक आहे. यामुळे दरही समाधानकारक आहेत.
- बन्सीलाल महाजन, भाजी विक्रेता
लाॅकडाऊननंतर काहीअंशी भाजीपाल्याचे दर वाढले आहेत परंतु त्या भाज्यांची आवक वाढल्यानंतर ते दरही कमी होतील.
-विजय माळी, व्यापारी,
कोरोनाकाळात शहरातील स्टेशन रोड तसेच इतर भागात मुबलक भाजीपाला मिळत होता. हा भाजीपाला अत्यंत स्वस्त दरात होता. ताजा भाजीपाला मिळत असल्याने सोय झाली होती.
-पूनम पाटील, गृहिणी
घरापर्यंत येणारे विक्रेते काहीअंशी भाजीपाला महाग देत होते; परंतु बाजारातील गर्दीपेक्षा घराजवळ येणारा विक्रेत्याकडून भाजी घेणे पसंत केले. भाजीपाला दर यंदाही स्थिर आहेत.
-रेखा पाडवी, गृहिणी