लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील गावठाणचे रोहित्र १५ दिवसापासून निकामी झाल्यानंतर प्रतापपूरसह परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून तीन रोहित्र बसविण्यात आले. परंतु ते सुरू होण्यापूर्वीच निकामी झाल्याने ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.दरम्यान, याठिकाणी अधीक क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणीही व्यावसायिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत रोहित्र नादुरूस्त झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रोहित्र जळाल्याने ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने जनरेटर मागवून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करून पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे.खंडित वीजपुरवठ्यामुळे बँकेतील व्यवहार व इतर व्यवसायावरदेखील परिणाम झाला असून, ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून याठिकाणी नव्याने अतिरिक्त क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करून ग्रामस्थ व व्यावसायिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तीन वेळा रोहित्रे बसवूनही सुरू होण्याआधीच झाली निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:58 IST