लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सारंगखेडा, ता.शहादा येथे 10 ते 27 डिसेंबर या कालावधीत श्री दत्तप्रभूंची यात्रा भरणार आहे. यात्रा उत्सव कालावधीत परिसराची स्वच्छता आणि येणा:या यात्रेकरूंची सुरक्षा या दोन्ही बाबींवर विशेष लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये व यात्रा शांततेत पार पाडावी या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रेच्या आयोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड, शहाद्याचे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले की, यात्रा परिसरात स्वच्छता करून फवारणी करण्यात यावी. यात्रेत मोठय़ा प्रमाणात भाविक येणार असल्याने सांडपाणी व्यवस्था निटपणे होईल याची दक्षता घ्यावी. यात्रेदरम्यान आवश्यक रुग्णवाहिका ठेवण्यात याव्यात आणि परिसरातील गावात असलेल्या आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात औषधे ठेवण्यात यावीत. यात्रेत आपत्ती काळात वैद्यकीय सेवा देण्यासाठी दुचाकीचा (बाईक)चा वापर करण्यात यावा. पोलीस दलातर्फे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात यावा व या कक्षात प्रत्येक संबंधित विभागाचा एक अधिकारी 24 तास उपस्थित राहील याबाबत नियोजन करावे. यात्रेदरम्यान विद्युत आणि भ्रमणध्वनी सेवा सुरळीत राहील याकडे संबंधित अधिका:यांनी लक्ष द्यावे. रात्रीच्यावेळी भारनियमन करू नये. दुकानातून देशी दारू विक्री होणार नाही आणि अवैध मद्य वाहतूक होणार नाही याबाबत उत्पादन शुल्क विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक पंडीत म्हणाले की, यात्रा काळात 150 पोलीस व तेवढय़ाच प्रमाणात होमगार्डची नेमणूक करण्यात येणार आहे. सात ते आठ सेक्टरमध्ये संपर्क यंत्रणा स्थापित करण्यात येईल. गुन्हे नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार आहेत. दोन अग्निशमन वाहनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महावितरणने यात्रेतील अवैध विद्युत जोडणीविरोधात तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गर्दीत न थांबविता वाहनतळावरच थांबवाव्यात, अशी सूचना त्यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गोगटे यांनी प्रत्येक विभागाच्या जबाबदारीविषयी माहिती दिली. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सारंगखेडा यात्रेत स्वच्छता व सुरक्षेवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:42 IST