नंदुरबार : कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातदेखील अपेक्षित जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. खासगी रुग्णालयांमध्येदेखील अनेक ठिकाणी कोविडसदृश लक्षणे असलेले रुग्णच उपचारासाठी येत असल्यामुळेदेखील इतर आजारांच्या रुग्णांची फिरफिर होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे इतर आजारांवरील शस्त्रक्रियेचे प्रमाणदेखील ४० टक्केपर्यंत आले आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांची फिरफिर होत आहे. बहुतेक खासगी डॅाक्टरांनी स्वत:चे किंवा सामूहिकरीत्या कोविड रुग्णालये सुरू केली आहेत. त्यामुळे अशा डॅाक्टरांना इतर आजारांचे रुग्ण तपासण्यास वेळच नसल्याची स्थिती आहे. जिल्हा रुग्णालयातदेखील आधीच कोविड कक्षासाठी डॅाक्टर नाहीत, त्यामुळे इतर रुग्णांच्या ओपीडीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आहे.
इतर आजारांच्या शस्त्रक्रियाही रखडल्या
n कोरोनाच्या भीतीमुळे इतर आजारांच्या शस्त्रक्रियादेखील करण्यास रुग्ण धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांची संख्या कमालीची रोडावली आहे. जिल्हा रुग्णालयातदेखील हीच स्थिती आहे. मे महिन्यानंतरच डॅाक्टरदेखील रुग्णांना शस्त्रक्रियेची तारीख देत आहेत.
ग्रामीण भागातही...
शहरी भागात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत. इतर रुग्णांबाबतही तीच स्थिती आहे. शहरीसह ग्रामीण भागातदेखील इतर आजारांच्या रुग्णांवर उपचारासाठी डॅाक्टर धजावत नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातदेखील तीच स्थिती आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना घरगुती इलाजावरच भर द्यावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.