सर्वोच्च न्यायालाने ४ मार्च २०२१ रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणुका तत्काळ प्रभावाने रद्दबातल ठरविल्या होत्या. रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी,२९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी मंगळवार २९ जून ते सोमवार ५ जुलै असेल. मंगळवार ६ जुलै नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. १२ जुलैपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे. सोमवार १९ जुलै रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मंगळवार २० जुलै रोजी सकाळी १० पासून मतमोजणीस सुरूवात होईल. निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.
जिल्हा परिषदेचे ११ गट
नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत खापर, अक्कलकुवा, म्हसावद, लोणखेडा, पाडळदे बु, कहाटुळ, कोळदे, खोंडामळी, कोपर्ली, रनाळा, मांडळ या ११ गटांचा समावेश आहे.
पं.स.चे १४ गण
पंचायत समितीअंतर्गत अक्कलकुवा पं.स.मधील कोराई, शहादा पं.स.मधील सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, डोंगरगांव, मोहिदे तह, जावेद तबो, पाडळदे ब्रु, शेल्टी, नंदुरबार पं. स.मधील गुजरभवाली, पातोंडा, होळ तर्फ हवेली, नांदर्खे आणि गुजरजांभोली या १४ निर्वाचक गणासाठी पोट निवडणूक होणार आहे.
पक्षीय बलाबल
जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ५६ असून त्यातील ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने उर्वरित ४५ सदस्यांपैकी काँग्रेसचे २१, भाजपचे १६, शिवसेनेचे ५, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. बहुमतासाठी एकूण २९ सदस्यांची गरज असते.
काँग्रेस-सेना एकत्र
जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेची आघाडी आहे. काँग्रेसच्या सीमा वळवी या अध्यक्षा असून सेनेला उपाध्यक्षपद देण्यात आले होते; परंतु उपाध्यक्ष राम रघुवंशी यांचे सदस्य रद्द झाले आहे.