नंदुरबार : मोटारसायकलखाली कोंबडी मेल्यानंतर भरपाईची रक्कम देऊ करणाऱ्या दोघांना मारहाण करत तलवारीने वार केल्याची घटना जुना बैल बाजार भागात घडली़ गुरुवारी सकाळी ९ वाजता घडलेल्या घटनेनंतर या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़कमल रमेश कडोसे रा़ मेहतर गल्ली यांच्या मोटारसायकलखाली हारुण पठाण यांची कोंबडी आल्याने तिचा मृत्यू झाला होता़ घटनेनंतर कमल कडोसे हे भाऊ गुड्डू रमेश कडोसे याच्यासह नुकसानभरपाई देऊ करण्यासाठी गेले होते़ यावेळी हारुण पठाण, शामीम बानो आणि हलीम पठाण या तिघांनी दोघा भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यादरम्यान संशयितांपैकी एकाने कमल यांच्या डोक्यात रॉडने तर त्यांच्या भावास तलवारीने मारले़ यातून दोघेही गंभीर जखमी झाले़ यावेळी हारुण पठाण याने दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली़घटनेनंतर या भागात एकच गर्दी जमली होती़ अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे तातडीने ताफ्यासह दाखल झाल्याने परिस्थितीवर नियत्रंण आले़ दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ याबाबत कमल कडोसे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार करत आहेत़ परिसरात शुक्रवारीही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़
नंदुरबार शहरात एकावर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:26 IST