नंदुरबार : वाढत्या तापमानाचा फटका जनावरांनाही बसताना दिसून येत आहे़ तापमान वाढीमुळे जनावरांचे आरोग्य खालावले आहे़ त्यामुळे पशुधन विकास विभागाकडून पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे़ या पथकांकडून गावोगावी जाऊन वाढत्या तापमानापासून पशुधनाचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़वाढत्या तापमानामुळे जनावरांवर दुष्परिणाम होत आहे़ तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येणे, जनावरांच्या खुरांचे सालटे निघणे, उष्णतेमुळे शरिरातील पाणी कमी होणे, जनावरांना ताप येणे आदी विविध समस्या भेडसावत असतात़ त्यामुळे साहजिकच पशुपालकांसमोर समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे़ सध्या नंदुरबारातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ अवकाळी पावसाचे दोन ते तीन दिवस वगळता मार्चपासून तापमान चाळीशीच्या जवळपास पोहचले आहे़ सध्या तर तापमान ४१ ते ४२ अंशावर स्थिर आहे़वाढत्या तापमानामुळे मनुष्यासह जनावरांच्या जिवाचीही लाही लाही होत आहे़ त्यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याची भिषण टंचाई असल्याने साहजिकच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची कशी काळजी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे़ संबंधित कर्मचाºयांकडून पशुपालकांचे प्रबोधन करुन आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, जनावरांच्या गोठ्यातील वातावरण थंड ठेवण्यासाठी काय उपाय योजना कराव्या आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़तोंडखुरी, पायखुरी लसीकरण मोहिमनंदुरबार जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून २१ एप्रिल ते २० मे दरम्यान, तीन महिन्यांवरील जनावरांसाठी तोंडखुरी-पायखुरी लसीकरण राबविण्यात येत आहे़ याबाबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़ तोंडखुरी-पायखुरी आजारामध्ये जनावराला सुरुवातीला खूप ताप येणे, मुखदाह होणे, लाळ वाहणे, तोंडाच्या दुखापतीमुळे खाणेपिणे बंद होणे, जिभेला चट्टे पडणे, तोंडात व पायाच्या खुरात जखमा होणे व त्यामुळे जनावरे लंगडणे आदी लक्षणे दिसून येत असतात़दुधाळ जनावरे दूध देणे कमी करतात किंवा बंद करतात़ शेती उपायोगी जनावरे काम करण्यायोग्य राहत नाहीत़ त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ शकते़ हा आजार मे ते आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक आढळून येत असतो़त्यामुळे याबाबतही पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंधृन उपायुक्त डॉ़ शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील व सहाय्यक उपायुक्त डॉ़ के़टी़ पाटील यांनी केले आहे़
वाढत्या तापमानाचा जनावरांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:40 IST