लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या चार तासात शिक्षण विभागाने दोन आदेश काढून शिक्षक आणि शाळांना चांगलेच बुचकाळ्यात पाडल्याची बाब सोमवारी घडली. निमित्त होते संविधान दिनानिमित्त शाळांच्या वेळांबाबत. अखेर नेहमीच्या वेळेतच शाळा भरविण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले. मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शाळांमध्ये संविधान उद्धीशिकेचे वाचन करणे, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करणे, गावागावांमध्ये नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्याची माहिती देणे यासह विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागातर्फे देण्यात आले होते. शिवाय सकाळी ध्वजारोहन करण्याचेही सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका खाजगी प्राथमिक शाळा, सर्व माध्यमिक शाळा या सकाळच्या वेळेत भरविण्याचे आदेश सोमवारी दुपारी शिक्षण विभागाने काढले. त्या दृष्टीने अनेक शाळांनी विद्याथ्र्याना सुचना देखील दिल्या. ध्वजारोहनाची तयारी देखील सुरू करण्यात आली. सकाळचे शेडय़ूल तयार करण्यात आले.परंतु लागलीच तीन तासात दुसरा आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून येवून धडकला. ध्वजारोहन कार्यक्रम रद्द करण्यात यावा तसेच शाळांच्या वेळा या पूर्वीप्रमाणेच राहू द्याव्या असे त्या आदेशात नमुद करण्यात आले होते. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये यापूर्वीच्या आदेशाची सुचना देण्यात आली होती. त्यामुळे शाळांची चांगलीच गोची झाली. सकाळच्या शाळेची करण्यात आलेली तयारी, झालेले नियोजन पुन्हा रद्द करण्यात आले. यामुळे शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.विशेष म्हणजे हे दोन्ही आदेश हे शिक्षकांच्या आणि शिक्षण विभागाच्या व्हॉट्सअप गृपवर टाकण्यात आले होते. त्यामुळे ग्रामिण भागात ज्या ठिकाणी इंटरनेटची रेंज नसते अशा ठिकाणी हे आदेश उशीराने आले. इंटरनेटची रेंज येताच दोन्ही आदेश येवून धडकल्याने अशा शाळांवरील शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. विद्याथ्र्याना नेमकी कोणती सुचना द्यावी या संभ्रमात शिक्षक होते. शिक्षणाधिकारी कार्यालयातील या सावळा गोंधळाची मात्र शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच खिल्ली उडवत चर्चा करण्यात आली.
शिक्षण विभागाच्या एका पाठोपाठ दोन आदेशाने शिक्षकांची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:28 IST