नंदुरबार : जिल्ह्यातून जाणाऱ्या उधना-जळगाव रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले छोटे रेल्वेस्थानकांवर पुन्हा वर्दळ दिसून येत असून ही स्थानके धूळ झटकून तयार करण्यात आली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या अनेक कारणांमुळे स्थानिक नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहेत. रोजगाराचे साधन असलेल्या या गाड्यांमधून शहरी भागापर्यंत मोळ्या, हिरवा चारा, आठवडे बाजारासाठी तांदूळ आणि भाजीपाला घेत आदिवासी बांधव व महिला नंदुरबार किंवा नवापूरकडे जात होत्या. परंतु गेल्या दीड वर्षांपासून या गाड्या बंदच होत्या. मार्चपूर्वी मेमो ट्रेन सुरू झाल्या असल्या तरी त्यातून प्रवास करणे जिकिरीचे होत होते. यामुळे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नियोजनानुसार पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातून प्रवाशांना मोठा आधार मिळाला असून दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
सुरू असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या
सुरत-भुसावळ
भुसावळ-सुरत
सुरत-नंदुरबार
सुरत-अमरावती
सुरत फास्ट पॅसेंजर
पॅसेंजर गाड्या सुरू झाल्याने गुजरात राज्यातून प्रवाशांची होणारी वाहतूक पुन्हा वाढली आहे. यातून स्थानकांची आर्थिक स्थितीही सुधारत असल्याची माहिती देण्यात आली.
सर्व स्थानके सुरू
उधना-जळगाव मार्गावरील कोळदा, नवापूर, खातगाव, चिचंपाडा, खांडबारा, भादवड, ढेकवद, रनाळे, तिसी, चाैपाळे हे जिल्ह्यातील स्टेशन्स सध्या सुरू करण्यात आले आहेत.
पॅसेंजर गाड्या ह्या नवापूर ते नंदुरबार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरत आहे. या मार्गाने अनेक जण किरकोळ वस्तू विक्रीसाठी नंदुरबारकडे जातात. वर्षभरापासून रेल्वे बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाह थांबला होता. आता मात्र समस्या सुटली आहे.
-प्रमोद पवार, प्रवासी,
गुजरात राज्यातून कपड्याचा माल आणण्यासाठी पॅसेंजर ट्रेन हा चांगला पर्याय होता. परंतु कोरोनामुळे ट्रेन बंद झाल्याने माझ्यासारख्या इतरांनाही माल आणण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. यातून खर्च वाढला होता. आता मात्र चिंता नाही.
- जितेंद्र सोनार, नंदुरबार.
व्यावसायिक खूष
पॅसेंजर रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ तसेच इतर साधनांची विक्री करणारे दीड वर्षांपासून बेरोजगार होते. कोरोनामुळे एक्सप्रेस गाड्यांचा पास मिळत नव्हता. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने परवानाधारकांचे हाल होत आहे. गाड्या सुरू झाल्याने तेही खुश आहेत.