सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व कामधंदे, छोटेमोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या सोयीसाठी बचतगटाच्या माध्यमातून १५ ते २० हजारांपर्यंत अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते. जयनगरसह परिसरातील अनेक गावातील महिलांनी बचतगटाचे कर्ज उचलले आहे.
कोरोना महामारीच्या अगोदर महिला रोजंदारीने कामाला जाऊन आपला हप्ता सुरळीतपणे भरत होते. मात्र, आता शेतातही मशागतीचे काम चालू असल्यामुळे महिलांना शेतातही मजुरीच्या कामाला जाता येत नाही. त्यामुळे हातात पैसे नसल्यामुळे महिलांना बचतगटाचे हप्ते भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
सध्या कोरोना व संचारबंदीमुळे गरीब व मध्यवर्गीय कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत आहे. त्यातच कर्जाचे हप्ते कुठून भरणार? त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत सापडले आहे.
लॉकडाऊनच्या आधीपर्यंत महिलांनी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले आहेत. मात्र, मागच्या वर्षी मार्च महिन्यापासून ठरावीक अंतराने लॉकडाऊन लागल्यामुळे छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडल्याने अनेक महिलांना घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये खासगी कंपन्यांनी महिलांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, संचारबंदीत सगळ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने कर्जाचे हप्ते भरायचे कसे, असा प्रश्न महिलांना भेडसावत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावू नये, अशी प्रतिक्रिया महिला मंडळाकडून ऐकायला मिळत आहे.