तळोदा : मुलांच्या अर्ध्या तिकीटावरुन प्रवासी महिला आणि तिकीट तपासणी पथक यांच्यातील वाद रविवारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचला़ महिलेने तब्बल दीड तास बस रोखून धरल्याने इतर प्रवाशांचाही चांगलाच खेळखंडोबा झाला़ शेवटी तपासणी अधिकाऱ्यांनी आपल्याकडील पैसे उर्वरीत तिकीटासाठी वाहकाकडे दिल्याने बस अखेरीत नियोजीत स्थळी रवाना झाला़ परंतु महिलेच्या दबंगिरीची दिवसभर तळोद्यात चर्चा होती़मिळालेल्या माहितीनुसार अंगलेश्वर-शहादा बस (क्रमांक १८ झेड ४४९०) ही गुजरात डेपोची बस रविवारी सकाळी शहाद्याकडे येण्यास निघाली होती़ याच बसमध्ये एक ४५ वर्षीय महिला शहाद्याकडे येण्यासाठी आपल्या तीन मुलांसह बसली होती़ तिने वाहकाकडून तिचे तीन मुलांचे अर्धे तिकीट घेतले़ त्यानंतर सदर बस तळोदा बस स्थानकात आली़ तेथेच गुजरातच्या परिवहन विभागाचे तिकीट तपासणीस पथकाने बसमधील सर्व प्रवाशांचे तिकीटे तपासणी केले़ त्या वेळी नियमापेक्षा मुलांचे वय जास्त असताना अर्धे तिकीट काढल्याचे त्याच्या लक्षात आले़ तेव्हा पथकातील अधिकारी सुरेशभाई पटेल यांनी महिलेस यांनी महलेस याबाबत जाब विचारला़ त्यांनी ५०० रुपये दंड भरण्याची सूचना केली़ परंतु महिलेने दंड न भरता याउलट पथकाच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला होता़ रक्कम भरण्यास स्पष्ट नका दिल्यामुळे हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला़प्रवाशांसह बसही पोलीस ठाण्यात नेण्यात आली़ तेथेही या महिलेने पोलिसांसमोर अधिकाºयांशी हुज्जत घातली़ अधिकाºयांना अरेरावीदेखील केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली़ यामुळे महिला पोलीस कर्मचाºयांनी संबंधित महिलेस आपल्या खाक्या दाखवला़ परंतु तिने दंड भरण्यास स्पष्ट नकार दिला़ तिच्या सोबत असलेल्या इसमाने तेथून पळ काढला होता़तब्बल दीड तास त्यांच्यात वाद रंगला होता़ शेवटी त्यांच्या वादामुळे बसमधील प्रवासी चांगलेच वैतागले होते़प्रवाशांनी तेथून बस काढण्याच्या आग्रह धरल्यामुळे तपासणी अधिकाºयांना माघार घ्यावी लागली़ त्यांनी स्वताच्या खिशातून पदरमोड करत त्या मुलांच्या उर्वरीत तिकीटाची रक्कम वाहकाकडे भरली आणि वादावर पडदा पडला़ पैसे भरल्यावर त्या महिलेला घेऊन बस पुढील दिशेने रवाना झाली़ सदर दबंग महिलेच्या दादागिरीचा किस्सा तळोदा शहरात संपूर्ण दिवसभर चर्चेला येत होता़
दबंग महिलेमुळे एसटीतील वाद मिटला ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:59 IST