लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : संपूर्ण सातपुड्यातील आदिवासींच्या प्रतिक्षेतील काठी ता. अक्कलकुवा येथील राजवाडी होळीसाठी गुजरातच्या जंगलातून बांबूचा टोकर आणला जात आहे. या होलीत रात्रभर ढोल वादन व होळीगिते सादर होणार आहेत.राजवाडी होळीसाठी काठी संस्थानचे सर्व वारदार विशेष योगदान देत आहे. संस्थानचे प्रमुख उमेद लक्ष्मण पाडवी यांच्यापासूनची वंशावळ उपलब्ध असल्याने काठीचे सरकार या भागात उमेद सरकार म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचे राजे मानसिंग आणि पृथ्वीसिंग यांचे वारसदार आहेत. भगतसिंग पाडवी, प्रतापसिंग पाडवी व उदेसिंग पाडवी हे राजे मानसिंगचे वारसदार होते. त्यांच्या सुपुत्रांपैकी महेंद्र प्रतापसिंग पाडवी सध्या राजकुमार म्हणून ओळखले जात आहे. संस्थानचे इतरही बहुतांश वारसदार होळीसाठी काठी येथे येतात. हे सर्व वारसदार होळी पौर्णिमेच्या सायंकाळी पाच वाजता एका विशाल वटवृक्षाखाली देवपूजा करून होलिकोत्सवास प्रारंभ करणार आहेत. त्यानंतर बाहेरगावाहून दाखल झालेल्या होळी नृत्य पथके पारंपरिक वाद्यांच्या तालावर आपले कसब दाखवतील.या उत्सवासाठी लगतच्या गुजरात राज्यातून काठी, वडफळी, पाटीलवाडी येथील नऊ जण होळी घेऊन येत आहे. काठीची होळी ही राजवाडी होळी म्हणूनही परिचित आहे. पंचक्रोशीत तिला विशेष महत्त्व आहे. उपलब्ध माहितीनुसार सन १२४६ पासून येथे हा सण उत्सव उत्साहात साजरा केला जात असून यंदाही परंपरेनुसार मंगळवारी पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी काठी संस्थानचे राजकुमार महेंद्रसिंग प्रतापसिंग पाडवी यांच्या हस्ते होळी पेटविण्यात येणार आहे.तत्पूर्वी रात्रभर पारंपरिक वाद्यांचा निनाद सातपुड्याच्या दऱ्याखोºयात घुमणार आहे. या वाद्यांच्या तालावर लयबद्ध नृत्य सादर होतील. परिसरातील वाड्या - पाड्यांवरुन जमलेल्या जवळपास हजारो बावा व बुध्यांची पथके फेर धरून नाचणार आहे.गुजरात राज्यातील नामगिर, हाकडी गांवाजवळ वागण-तामण या डोंगरांच्या जंगलातून बांबू (होळीदांडा) आणला जात आहे. तेथे पुर्वी नांदु भील राजाचे (मोढोराज) राज्य होते. ते आज राजपिपला जिल्ह्याचे ठिंकाण बनले आहे. होळीचे सेवेकरी ८ मार्च रोजी मोकस येथे मुक्कामी थांबले, ९ मार्च रोजी पिंपळखुटा, बारीसुरगस, बिजरीगव्हाण, सोराचापडा, लिंबीपाडामार्गे काठी गावाच्या शिवारात सिसमच्या झाडाजवळ पुजनासाठी होळी ठेवली जाणार आहे.
काठीत गुंजणार ढोलचा सुरेल आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:10 IST