महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रकल्प संचालक प्रदीप लाटे उपस्थित होते.
जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविल्या गेलेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १० हजार ४३१ नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. आज झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे वेळी प्रातिनिधीक स्वरुपात ५ लाभार्थींना घराच्या चाव्या देण्यात आल्या. तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरदेखील प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यात आली.
महाआवास अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत एकूण ९६१६ घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनाअंतर्गत एकूण ८१९ लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले.
आज राज्यपातळीवर एकाच दिवशी हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २३ हजार घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला.