केवळ जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय परीक्षा, पूर्वनियोजित परीक्षा, नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे या कारणांसाठी नागरिकांना प्रवेशासाठी मुभा असेल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे आणि ७२ तास पूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे व बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना दाखविणे आवश्यक असेल. अशा व्यक्तींसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा रॅपीड अँटिजन चाचणीची व्यवस्था करेल. अहवाल निगेटिव्ह आल्यास प्रवेश देण्यात येईल. जिल्ह्यात लॉकडाऊन असले तरी सार्वजनिक कामे, शासकीय रस्ते, आरोग्यविषयक सोई यासंबंधीची कामे सुरू राहतील. कामावरील मजुरांची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी करण्यात यावी. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप केवळ वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने, शेतीविषयक सर्व कामांसाठी पेट्रोल व डिझेल वितरित करतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शेतीविषयक सर्व कामे सुरू राहतील. जिल्ह्याच्या सीमेवरील भागात राहणाऱ्या इतर जिल्ह्यांतील व्यक्तींना शेतीविषयक कामासाठी तहसीलदार ओळखपत्र देतील.
पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू राहील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.