नंदुरबार : यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७३ हजार हेक्टरवर पीकपेरा होणार असल्याने त्यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून खरीप आढावा बैठकीत करण्यात आले़ यावेळी जिल्हा बँकेकडून पाच हजार खातेदार शेतकरी व २३४ विकासो संस्था यांना ४० कोटी रुपयांचे पीक कर्ज देणार असल्याची माहिती देण्यात आली़जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी गत वर्षीच्या खरीप हंगामाचा आढावा घेतला़ बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे, जिल्हा उपनिबंधक एस़वाय़पुरी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व बँकांचे अधिकारी उपस्थित होते़ बैठकीत जिल्हाधिकारी मंजुळे यांनी बियाणे, खते, २०१९-२० साठी पीक लागवडीचे उद्दीष्ट, पतपुरवठा या विषयांचा आढावा घेतला़ कृषी विभागाकडून यात २०१९ साठी खरीप हंगामात भात २१ हजार, ज्वारी २७ हजार, मका २९ हजार, तूर १६ हजार, सोयाबीन २९ हजार आणि कापूस ८८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली़जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी सांगितले की, हंगामात ३७ हजार ७८३ क्विंटल बियाणांची मागणी असून आवश्यक प्रमाणात ते उपलब्ध होणार आहे़ मागील वर्षी बियाण्यांच्या ३०९ नमुन्यापैकी ५ अप्रमाणित घोषित असून संबधिताविरुद्ध न्यायालयात खटला दाखल आहे़ रासायनिक खतांची आवश्यकता लक्षात घेऊन १ लाख १४ हजार ८०३ मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवल्याचे आणि त्यापैकी १ लाख ५८० मेट्रिक टन खत उपलब्ध होणार रब्बी हंगामातील २४ हजार ९७० मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी खतांचे ७३ नमुने अप्रमाणित घोषित झाले आहेत़ किटकनाशकांचे ६ नमुने अप्रमाणित घोषित झाले आहेत़कृषी विभागाने भाजीपाला आणि फलोत्पादन क्षेत्र वाढीवर भर देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशा सूूचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी बैठकीत केल्या़
जिल्हा बँक देणार ५ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींचे पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:22 IST