शहरातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्या दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र लसीच्या तुडवड्यामुळे नागरिकांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आपला डोस चुकू नये म्हणून लस घेणाऱ्या नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. एवढेच नव्हे येथील केंद्र सकाळी नऊ वाजता सुरू होत असताना नागरीक सकाळी आठ वाजल्यापासूनच येत असतात.
शुक्रवारी दुपारी केंद्रावर ज्यांच्याकडे लसीचे टोकन नव्हती अशांना मागच्या दरवाजाने आता प्रवेश देवून लस दिली जात होती. त्यामुळे अधिकृत टोकन असलेल्या नागरिकांनी त्यास मज्जाव केला होता. या प्रकारामुळे चांगलाच वाद रंगला होता. यामुळे प्रचंड गोंधळ देखील उडाला होता. वातावरणही चांगलेच तणावपूर्ण बनले होते. शेवटी रूग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होवून टोकन नसलेल्यांना बाहेर काढले. त्यानंतर उर्वरित लोकांचे शांततेत लसीकरण करण्यात आले. या केंद्रावर लसींचा प्रचंड तुटवडा भासत असल्यामुळे असे चित्र निर्माण होत आहे. तथापि केंद्रावर नियोजनाचा अभावदेखील दिसून आला आहे. कारण नागरिकांना बसण्यास पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे सर्वच एका ठिकाणी गोळा झाले होते. विशेषत: महिलांना देखील जागा अभावी पुरूषांच्या घोळक्यातच उभे राहावे लागल्याचे चित्र होते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. लसीकरणा दरम्यान तेथे कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे केंद्रावर सावळा गोंधळ दिसून आला होता. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
केंद्रावरील बंदोबस्ताबाबत पोलिसांची उदासीनता
तळोदा शहरातील नागरिकांना लसिकरणासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात केंद्र उभारण्यात आले आहे. ४० हजाराच्या लोकसंख्येसाठी केवळ एकच केंद्र दिले असल्यामुळे साहजिकच नागरिकांची गर्दी देखील वाढत असते. परिणामी मोठा गोंधळ देखील उडत असतो. या गोंधळात लसीच्या तुटवड्याने अधिक भर घातली आहे. वास्तविक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेवून निदान लसीकरण दरम्यान तरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे दिसून आले नाही. येथील पोलीस बंदोबस्तासंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यास विचारले असता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासाठी दोन वेळा पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. परंतु अजूनही त्या पत्रावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. या वेळी पोलिसांनी बंदोबस्ताबाबत उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना शिस्तीने उभे राहण्याचा सूचना कर्मचारी देत असतात. परंतु त्यांचे कोणीच ऐकत नाही,अशी व्यथादेखील या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या वृध्द व महिलांची सुरक्षितता लक्षात घेवून येथे कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.