तळोदा : तळोदा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत, परंतु काही कर्मचारी हे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची बदली झालेली नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा स्तरावरील पोलीस कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपाई अशा एकूण १३२ पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण पोलीस कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या जात असतात. या पार्श्वभूमीवर तळोदा शहर पोलीस ठाण्यामधीलही काही पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाने समावेश केला आहे. मात्र, पोलीस ठाण्यामध्ये काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांना आधीच एकदा मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु तरीही दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत वाढ परत देता येते का, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुन्हा-पुन्हा ठरावीक कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यामागे काय कारण आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, काही पोलीस कर्मचाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. काही कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ याच पोलीस ठाण्यामध्ये पाच वर्षांहून अधिक होऊनही त्यांची बदली होत नाही. त्यामुळे ठरावीकच पोलीस कर्मचारीच बदलीला अपवाद का ठरत आहेत. त्यांनाच परत परत संरक्षण का दिले जाते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. साहजिकच जिल्हा प्रशासनाने याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.
मागील पाच वर्षांत तर तळोदा पोलीस ठाण्यांतर्गत अनेक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. काही कर्मचारी तर याच ठाण्यात निवृत्तही झाल्याची उदाहरणे आहेत, परंतु काही ठरावीक पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याची पोलीस ठाण्याच्या वर्तुळात चर्चा आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा पूर्ण अधिकार वरिष्ठांचा आहे. पोलीस ठाण्यांतर्गत तीन-चार कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे. या कर्मचाऱ्यांकडून बदली स्थगितीचा विनंती अर्जाचा विचार करून, बदलीला स्थगिती देण्यात येऊ शकते.
-पंडितराव सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तळोदा.