रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्षाच्या नेत्यांच्या आदेशापेक्षा सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा असून आपली उमेदवारी म्हणजे वंचित भाजपचा आवाज असल्याचे मत व्यक्त करीत भाजपाचे डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. गेल्या २४ तासात भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांच्या प्रयत्नानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.डॉ.सुहास नटावदकर यांनी कन्या डॉ.समीधा नटावदकर यांच्यासाठी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षातर्फे त्यांचे वय पाहता सबुरीचा सल्ला दिल्याने नटावदकर यांनी पक्षाचा आदेश पाळला. परंतु स्वत: अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपासाठी गेल्या दोन दिवसांपासून डोकेदुखी ठरली होती. या दोन दिवसात स्वत: डॉ.सुहास नटावदकर हे ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यांच्या पत्नी सुहासिनी नटावदकर यांच्याकडेच त्यामुळे मोबाईलने संपर्क करणाऱ्यांचा रेटा वाढला होता. या दोन दिवसात बाहेरील कार्यकर्ते अथवा इतर यंत्रणा व सुहास नटावदकर यांच्यातील संपर्काचे माध्यम त्याच झाल्या होत्या. या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह संघाचे पदाधिकारी व पक्षाच्या अनेक नेत्यांनी सुहास नटावदकरांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले. परंतु या साऱ्यांच्याच प्रयत्नांना अपयश आले.दोन दिवसानंतर शुुक्रवारी दुपारी चार वाजेनंतर डॉ.सुहास नटावदकर हे ‘रिचेबल’ झाले असून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी सुरू झाली आहे. त्यांच्या भूमिकेसंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षनेत्यांच्या आदेशाचा आपण सन्मान करतो. परंतु त्यापेक्षा भाजपतील तळागाळातील व जनसंघापासून कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. राज्यात व देशात सत्ता येऊनही माझ्यासकट हे सर्व कार्यकर्ते सत्तेचा आनंद व्यक्त करू शकले नाही. त्यामुळे वंचित भाजपचा आवाज म्हणून मी उमेदवारी करीत आहे. नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या माघारीसाठी दोन दिवसात अनेक प्रयत्न झाले. राजकारणात जे जे प्रयोग केले जातात ते सर्व अर्थात साम, दाम, दंड, भेदाला मी सामोरे गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपत बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आधीच संशयित असलेले वातावरण अधिक गडद झाले आहे. यापूर्वी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात नटावदकरांच्या पत्नी सुहासिनी नटावदकर यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी डॉ.विजयकुमार गावीत हे राष्टÑवादीचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत सुहासिनी नटावदकर यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही उघड पाठींबा देऊन ‘दे धक्का...’चे घोषवाक्य चर्चेत आणले होते. त्या निवडणुकीत मात्र डॉ.विजयकुमार गावीत मोठ्या फरकाने विजयी झाले होते. आता पुन्हा सुहास नटावदकर हे अपक्ष म्हणून उमेदवारी करीत आहेत. या वेळी त्यांचे निवडणूक चिन्ह ‘बॅट’ असून चिन्ह मिळताच त्यांनी आता कार्यकर्त्यांसमोर ‘दे घुमा के...’चा नारा दिला आहे.
वंचित भाजपच्या आवाजाची बंडखोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:30 IST