नंदुरबार : नंदुरबार आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत एका शासकीय आश्रम शाळा मुख्याध्यापकाच्या त्याच्या भाड्याच्या घरात युवतीसोबतच्या कारनाम्याची जोरदार चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात आहे. या मुख्याध्यापकाविरोधात तक्रार आल्यास चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रकल्प कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील एका मोठ्या गावातील आश्रम शाळेत मुख्याध्यापक असलेल्या संबंधिताने शहरालगत असलेल्या एका कॅालनीत भाड्याने घर घेतले होते. त्या ठिकाणी त्याने युवतीला रात्री आणले होते. त्याला कॅालनीतीलच काही जणांनी रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याने तेथून कशीबशी सुटका करून घेतली होती. परंतु ही बाब दुसऱ्या दिवशी चर्चेत आली. प्रकल्प कार्यालय वर्तूळ आणि शैक्षणिक क्षेत्रात या मुख्याध्यापकाच्या कारनाम्याचीच सध्या चर्चा सुरू आहे. त्याच्यासोबत सापडलेली युवती कोण, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्याध्यापकासारख्या व्यक्तीने केलेल्या या कारनाम्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना या विषयी विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात विभागाकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आली तर चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.