शहादा : थंड हवेचे पर्यटनस्थळ व गोरक्षनाथांची आध्यात्मिक भूमी असलेल्या तोरणमाळ येथील यशवंत तलाव हा पर्यटकांचे आकर्षण असून आध्यत्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे. या तलावास लागून अंघोळ करणे व कपडे बदलण्यासाठी घाटाची व्यवस्था नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ आहे. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या त्रिवेणी संगम राज्याच्या सातपुडा पर्वतात तोरणमाळ वसले आहे. येथे पोहोचण्याअगोदर भव्य यशवंत तलाव दिसतो. या तलावास अगोदर भरकारी नाव होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांनी दोनवेळा भेट दिल्याने राज्य शासनाने तलावाचे नाव ‘यशवंत तलाव’ ठेवले आहे. तोरणमाळ येथील यशवंत तलाव हा पर्यटन व आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. येथे गोरक्षनाथांची आध्यात्मिक भूमी म्हणून मानली जाते. महाशिवरात्री व याहामोगी माता यात्रेप्रसंगी तलावात आंघोळ करून सव्वातीन किलोमीटरची तलाव प्रदिक्षणा घालीत गोरक्षनाथांचा पाण्याने अभिषेक होतो. तर तलाव पर्यटकांसाठी आकर्षण आहे. तलावास लागून भाविक पर्यटकांना आंघोळ व कपडे बदलण्यासाठी घाट नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. त्यामुळे गेल्या अनेक वषार्पासूनची ही मागणी संबंधित विभागाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
घाट नसल्याने पर्यटकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 20:55 IST