बोरवण जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लास रूममधील दरवाजाचे कुलूप तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेले आहे. ३२ इंची एलईडी टीव्ही, इन्वर्टर बॅटरी, ब्रॉडकास्ट डोंगल असा एकूण ६० ते ६५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरी करून चोरटे रात्री शाळेच्या मागच्या बाजूने पसार झाले. तारेचे कम्पाउंडजवळ चोरट्यांचे बॅटरीचे साहित्य पडलेले आढळून आले. यासंदर्भात जिल्हा परिषद बोरवण शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरूण कोटवाल, उपसरपंच दिनेश गावित, पोलीस पाटील, विपिन गावित, ग्रामपंचायत सदस्य मिना गावित, चंद्रवती गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आमलाण शाळेत चोरी झाली होती, त्यानंतर बोरवण जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याने चोरटे बंद शाळांना टार्गेट करीत महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास करीत असल्याचे दिसून येत आहे. लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्यासाठी दिलीप गावित व यशोदा वसावे यांनी मोठे परिश्रम घेतले होते. शाळेतील साहित्य चोरीला गेल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
बोरवण शाळेतील डिजिटल साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST