नंदुरबार : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, २३ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी २३ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करतील, अशी माहिती आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आली. नऊ महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून, सतत पाठपुरावा करूनही कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचा लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेला नाही.या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सभा घेतली व त्या सभेत अंतिम निर्णायक विजयी लढा देण्याचा निर्णय घेऊन २३ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे आरोग्य कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.