जयनगर : जयनगरच्या उत्तरेकडे धांद्रे खुर्द या गावात पंधरा दिवसांपासून विहिरीची मोटार जळाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे या गावात उशाला पाणी असून घशाला कोरड अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.
धांद्रे खुर्द गावात लोकांना पाण्याची व्यवस्था म्हणून स्वतंत्र विहिरीची सोय करण्यात आली आहे. विहिरीमध्ये पंधरा दिवसांपासून मोटार खराब असून ती अजून दुरुस्त केलेली नाहीये. त्यामुळे येथील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी आजूबाजूच्या शेतातील विहिरी अथवा कूपनलिकेवर पाणी भरण्यासाठी जावे लागते. या गावात स्वतंत्र हातपंप आहेत. मात्र त्यातील दोन हातपंप नादुरुस्त असून एका हातपंपावर पाण्यासाठी लोकांची खूपच गर्दी होत असते. मागील दोन वर्षापासून पावसाळा चांगला झाल्यामुळे गावातील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु पंधरा दिवसापासून विहिरीची मोटार जळाल्यामुळे लोकांना पाहण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून प्रशासनाने त्वरित विहिरीची नादुरुस्त मोटार काढून त्वरित दुरुस्त करून टाकायला हवी. जेणेकरून पाण्यासाठी येथील ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत.