नंदुरबार : कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महागड्या स्मार्ट फोनवर ऑनलाईनचे शिक्षण नशिबी नसलेल्या विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या घरकुलात जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे महत्कार्य उपक्रमशील शिक्षिका पूजा वाणी यांनी केले आहे. यावेळी महिलांनी फळ्यावर धडे गिरवीत ज्ञानाची ज्योत पेटविण्याचा निर्धार केला.
साक्षरता दिनाचे औचित्य साधत शहरातील माय चाईल्ड पब्लिक स्कूलच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ अशी म्हण आहे. परंतु, घरात आईच शिकलेली नाही, म्हणून तिची मुलंही शिकली नसल्याचे ऐकिवात नाही. समाजात अशा किती तरी आया आहेत, ज़्यांनी शिक्षण घेतले नसले तरी, त्यांची मुलं आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
साक्षरता दिवसानिमित्त बुधवारी माय चाईल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा वाणी यांनी शहरातील भोणे फाट्याजवळील घरकुलात महिला व त्यांच्या मुलांची शाळाच भरवली. त्यांनी घरकुलातील सर्व महिलांना व मुलांना एकत्र जमा करीत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाप्रसंगी २० ते २५ महिला आणि मुलांनी सहभाग घेतला. या उपक्रमात मुलांना शाळेत जाण्याचे महत्त्व, स्वच्छता, नीटनेटकेपणा व टापटीपपणा यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेक मुलांनी ए बी सी डी व पाढ्यांचे वाचन केले. विचारलेल्या प्रश्नांना मुलांनी उत्तरे दिली.
परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आईचा घो...
या उपक्रमात महिलांनी फळ्यावर आपले स्वतःचे नाव लिहून दाखवले. घरकुलातील रहिवासी असलेल्या महिला आशा पाटील यांनी इंग्रजित त्यांचे नाव रेखाटले. शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर आवड होती. परंतु आर्थिक, सामाजिक परिस्थितीअभावी शिक्षण घेता आले नसल्याची खंत अनेक महिलांनी बोलून दाखविली.
वह्यांचे केले वाटप
उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना नगरसेविका भारती राजपूत यांच्याहस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका वृषाली पाटील, पूर्णिमा कासार, ओजस्विता सोनवणे, मोहिनी घाडमोडे उपस्थित होत्या.