शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवकृपा पाणी वाटप संस्था व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या खापरखेडा येथील लघु प्रकल्पाची निर्मिती १९७० ते १९७२ च्या काळात झाली. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पातून कोंढावळ, जयनगर, वडाळी या गावातील शेतकऱ्यांना लाभ झाला. मात्र, अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याचा परिणाम पाणी साठवणुकीवर झाला. यामुळे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १५० ते २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळीही खालावली जाते. गेल्या तीन वर्षांपासून मुख्य कूपनलिका गाळामुळे बंद आहे. म्हणून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणीपुरवठा होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
खापरखेडा लघु प्रकल्पाची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST